Home / Initiatives
राज्यातील महिला व मुली बेपत्ता होण्याची गेल्या काही महिन्यांतील आकडेवारी चिंताजनक असून या महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने समिती स्थापन करत शोध मोहिम राबवावी तसेच दर पंधरा दिवसांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर करावा अशी सुचना गृह विभागाला केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील मुली व महिला मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत असून यात १६ ते ३५ वयोगटातील महिलांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्र पोलिस, गृह विभाग या बेपत्ता महिलांच्या तपासासाठी करत असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आज राज्य महिला आयोग कार्यालयात सुनावणी घेण्यात आली.
या बैठकीत राज्यातील बेपत्ता होणाऱ्या महिला, त्यांच्या तपासासाठी पोलिस तसेच गृह विभाग करीत असलेली कार्यवाही, पोलिसांना बेपत्ता महिलांच्या तपासकार्यात येणारे अडथळे याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी आयोगाच्या सदस्या ॲड. गौरी छाब्रीया, सुप्रदा फातर्पेकर, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दिपक पांडे, कायदा व सुव्यवस्था पोलिस महासंचालक सुहास वारके, पोलिस उपायुक्त डॉ. स्वामी, गृह विभागाचे सह सचिव राहुल कुलकर्णी, महिला आयोगाच्या उपसचिव दिपा ठाकूर, विधीतज्ञ ॲड. विरेंद्र नेवे उपस्थित होते.