Home / Initiatives
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १३ जानेवारी २०२३ रोजी ‘महिलांच्या मानवी हक्कांचे संरक्षण’ या विषयावर विविध समाजघटकांचे चर्चासत्र आय़ोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाच्या वांद्रेस्थित कार्यालयातील सभागृहात दुपारी ४ ते ६ यावेळेत हा परिसंवाद पार पडला.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांना त्यांचे न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी अविरत कार्यरत आहे. महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती त्यांना मिळावी, आपल्या अधिकारांची जाणीव व्हावी यासाठी वेगवेगळे जनजागृतीपर कार्यक्रम आयोग राबवत असतो. राष्ट्रीय मानवी अधिकार आयोग मानवी मूल्यांची जपणूक, संविधानाने दिलेले अधिकार यांचे संरक्षण करण्याचे काम करत आहे. या दोन्ही यंत्रणा एकत्रित येत ‘महिलांच्या मानवी हक्कांचे संरक्षण’ याविषयी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांच्या मानवी हक्कांची सद्यस्थिती, त्यातील त्रुटी, महिलांच्या हक्कांचे होणारे उल्लंघन, भविष्यातील उपाययोजना आदी बाबत चर्चा झाली.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य श्री ज्ञानेश्वर मुळये , राजेंद्र जैन , महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या.के के तातेड महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, आयोगाच्या सर्व सदस्या, महिला व बाल विकास विभाग, विधी व न्याय विभाग, राज्य मानवी हक्क आयोग, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आदींचे प्रतिनीधी उपस्थित होते.