Home / Initiatives
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा कोकण दौरा सुरू असताना आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत रत्नागिरी नंतर दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनसुनावणी आणि आढावा बैठक झाली. कौटुंबिक समस्या, मालमत्ता वाद, आर्थिक फसवणूक, सामाजिक समस्या सह घरकुल, पाणी पुरवठा अशा योजनांचा लाभ नाही अशाप्रकारच्या १२० तक्रारींवर सुनावणी झाली. समुपदेशनाने कौटुंबिक कलह मिटवून पुन्हा संसार सुरू करणाऱ्या ३ जोडप्यांना पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्याच्या आढावा बैठकीस प्रशासन, पोलीस, परिवहन, आरोग्य, शिक्षण, कामगार अशा विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून योजनांची अंमलबजावणी, उपक्रम आदी विषयी सादरीकरण केले.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ उपस्थित होते.
जनसुनावणी आणि आढावा बैठक अशा या महिला आयोग आपल्या दारी कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधीशी बोलताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलींचे शिक्षणाचे, अर्थाजनाचे प्रमाण लक्षणीय आहे. गुन्ह्यांचे प्रमाण कमी असून पोलिसांची सक्रिय भुमिका कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील सखी वन स्टॉप सेंटरला जागा, निधी उपलब्ध करून देणे, कौटुंबिक समस्या कमी करणेसाठी समुपदेशन केंद्रांची संख्या वाढवणे, शासकीय वसतिगृह जिल्ह्यात नसल्याने त्यासाठी पाठपुरावा करणे अशा सूचना यावेळी जिल्हा प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.