मुख्यपृष्ठ / पुढाकार
महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. याआधी १ डिसेंबर २०२२ रोजी लातूर जिल्ह्याचा दौरा केला होता, तेव्हा सुद्धा आढावा बैठक घेतली होती. तेव्हा पोलीस प्रशासनाला तसेच कामगार आयुक्तांना ज्या सूचना दिला होत्या त्याबाबत त्यांनी केलेली अंमलबजावणी समाधानकारक आहे. पोलीस प्रशासनाने शाळांच्या भेटी वाढवत, आठ महिन्यात ७८ शाळांना भेटी दिल्या आहेत. पिंक बॉक्सची व्याप्ती ही आयोगाच्या सूचनेनुसार लातूर पोलीस प्रशासनाने वाढवली आहे. १८ वर्षाखालील मुलींच्या मिसिंग प्रकरणात लातूर पोलिसांची कामगिरी चांगली आहे. आज दिवसभरात समोर आलेल्या केसेस मध्ये पोटगी न देणे, न्यायालयातून वॉरंट आणल्यानंतर जाणीवपूर्वक गायब होणे, अशा गोष्टी करून महिलेला त्रास देण्याचे प्रमाण मोठे आहे हे निदर्शनास आले. अशा प्रकरणांमध्ये पोलीस अधीक्षकांनी आतापर्यंतची वॉरंट काढलेली पण अटक न झालेली, पोटगी देण्यात टाळाटाळ अशी सर्व प्रकरण एकत्र करून पुन्हा एकदा त्याबाबत कारवाई करावी अशा सूचना दिल्या. जिल्ह्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास विभागाने अधिकाधिक प्रशिक्षण द्यावे, स्वयंरोजगार द्यावा अशाही सूचना यावेळी दिल्या. आढावा बैठकीला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, सीईओ अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह कामगार, शिक्षण, आरोग्य, परिवहन, पोलीस प्रशासन अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.