मुख्यपृष्ठ / पुढाकार
महिला आयोगाच्या जिल्हा दौरा दरम्यान काल कोल्हापूर नंतर आज सांगलीमध्ये जनसुनावणी घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी झालेल्या जनसुनावणीला एकूण ८७ तक्रारी आल्या होत्या. पोटगी मिळत नाही, कॉलेजचे मुख्याध्यापकच त्रास देतात, तीन मुली झाल्याने सासरचे त्रास देतात अशा विविध विषयांच्या तक्रारी घेऊन महिला आल्या होत्या. माझ्यासह सर्व यंत्रणेने त्यांना सहाय्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आजच दिलासा मिळेल, न्याय मिळेल यासाठी आवश्यक ती कारवाई केली.
सुनावणी नंतर सांगली जिल्ह्यातील पोलीस, प्रशासन, शिक्षण, कामगार, परिवहन, आरोग्य अशा विभागांचा आढावा घेतला. जिल्ह्यात महिलांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी, आवश्यक मूलभूत सोयी सुविधांची उभारणी याबाबत माहिती घेतली. सांगलीमध्ये शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृतीची गरज आहे. मनोधैर्य योजनेची प्रकरणे प्रलंबित राहू नये यासाठी यापुढे जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालणार आहे. दुर्दैवानं हुंडा, त्यासाठी छळ आणि त्यातून आत्महत्या असे २१ गुन्हे गेल्या दीड वर्षात सांगलीमध्ये झाले आहेत, याबाबत मानसिकता बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेल्या दीड वर्षात बेपत्ता झालेल्या अठरा वर्षाखालील मुलींची आणि अठरा वर्षावरील महिलांची आकडेवारी देखील मोठी आहे. सांगलीला लागून राज्याची सीमा असल्याने या हरवलेल्या मुलींच्या तपासात काही अडथळे येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, मात्र त्यावरही पोलीस मात करत आहेत.
आढावा बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार यांचे सह आरोग्य, कामगार, शिक्षण, परिवहन, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.