Home / Initiatives
औरंगाबाद जिल्ह्यात समुपदेशन, सक्षमा (जेंडर रिसोर्स सेंटर), वन स्टॉप क्रायसेस केंद्रे तत्काळ कार्यान्वित करावीत. महिलांच्या कायद्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करावी, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या.
सुभेदारी विश्रामगृह येथे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, महिलांविषयक तक्रारी आदींचा आढावा श्रीमती रहाटकर यांनी घेतला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, महापालिकेच्या सभापती जयश्री कुलकर्णी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, प्र. पोलीस अधीक्षक गणेश गावडे, पोलीस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे, महिला सहाय्य कक्षाच्या मनिषा पाटील, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महिला व बालविकास अधिकारी तृप्ती ढेरे, महापालिकेच्या नीता पाडळकर, उपमुख्य कार्यकारी श्री. मिरकले, विधी व सेवा प्राधिकरणाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
श्रीमती रहाटकर यांनी जिल्हा परिषद, महापालिकेने महिलांना सक्षम करण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जिल्ह्यात महिनाभरात समुपदेशन केंद्रे सुरू करावीत. मुंबईच्या धर्तीवर आदर्श असे सक्षमा केंद्र उभारावे. या केंद्रात शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात यावी. कायदा व समुपदेशन केंद्र यात असावे. सायबर गुन्ह्याबाबत या ठिकाणी मार्गदर्शन व्हावे. महिलांना आर्थिक व कौशल्यपूर्ण शिक्षण या ठिकाणी मिळून साक्षरतेत वाढ व्हावी. विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सक्षमा केंद्रात असावे. तसेच हे केंद्र स्वयंसेवी संस्थांना सहकार्य करणारे असावे. या केंद्रातून महिलांना समान दर्जा उपलब्ध व्हावा. केंद्रात समुपदेशक, वकील, मानसोपचार तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ असावेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये असलेल्या स्वच्छता गृहांचे सर्वेक्षण करून 15 दिवसांमध्ये महिला व बालकल्याण विभागाने अहवाल सादर करावा. अशा सूचनाही श्रीमती रहाटकर यांनी दिल्या. त्याचबरोबर असंघटीत महिलांना कायद्याबाबत जनजागृती करावी. महिलांसाठी असलेल्या विविध योजना याबाबतचा प्रसारही करण्यात यावा, असेही त्या म्हणाल्या. पॉक्सो, सायबर गुन्हे, मनोधैर्य, अस्मिता योजनांबाबतही त्यांनी सूचना केल्या.
महापौर श्री. घोडेले, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, प्र. पोलीस अधीक्षक श्री. गावडे, श्रीमती ढेरे यांनी जिल्ह्यातील महिलांविषयक बाबींबाबत श्रीमती रहाटकर यांना माहिती दिली.
▪जनसुनावणीत 40 तक्रारींचा निपटारा ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत सुभेदारी विश्रामगृह येथे श्रीमती रहाटकर यांनी जनसुनावणी घेतली. या सुनावणीत एकूण 40 तक्रारींवर श्रीमती रहाटकर यांनी निर्णय घेऊन प्रकरणे संबंधितांकडे तत्काळ वर्ग केली. काही प्रकरणांमध्ये समुपदेशनही केले. या तक्रारींमध्ये बहुतांश तक्रारी मालमत्ता विषयक होत्या. तसेच कौटुंबिक, गुन्हे विषयक, पोलीस, महिला सहायक कक्ष आदी विभागाशी संबंधित तक्रारी होत्या. या जनसुनावणीस पोलीस विभागाच्या महिला सहायक कक्षाच्या प्रमुख मनिषा पाटील-कुलकर्णी, माधुरी अदवंत, सविता कुलकर्णी, साधना सुरडकर, आयोगाचे जिल्हा समन्वयक ॲ. पी.जे.गवारे, चंद्रकांत सोनवणे, संरक्षण अधिकारी रिना भाकरे, पी. डी. बमनाथ, के. बी. काकनाटे, विजय डोंगरे, कपील पाटील, एस.जी. कदम आदींची उपस्थिती होती.