Home / Initiatives
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नाने ओमान येथे अडकलेल्या महिलेची सुटका
■ आयोगाच्या 'सुहिता' हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीवरून महिलेला न्याय मिळवून देण्यात यश
मुंबई, ११ मे २०१८ :
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नाने आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने मस्कत, ओमान येथे अडकलेल्या फरीदा खान या महिलेची सुटका झाली आहे. या महिलेने आज पती सह आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची भेट घेऊन आभार मानले.
अंबरनाथ येथे राहणारया फरीदा खान नोकरीसाठी एजंटमार्फत दुबईला गेल्या मात्र त्यांनतर त्यांचा संपर्कच तुटल्याने त्यांचे पती अब्दुल अजीज खान यांनी महिला आयोगाच्या 'सुहिता' (७४७७७२२४२४) या हेल्पलाईनवर फोन करून आपली व्यथा सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अब्दुल अजीज खान यांना ०६/०४/२०१८ रोजी आयोग कार्यालयात बोलविण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे फरीदा या घरातील अडचणीच्या आर्थिक परिस्थितीमुळे २७ जानेवारी २०१८ रोजी दुबई येथे नोकरीसाठी गेल्या मात्र त्यानंतर त्यांना मस्कत येथे पाठविण्यात आले आणि त्यांचा कुटुंबियांशी संपर्क तुटला. त्यांना जिथे कामासाठी पाठविण्यात आले तिथे त्यांचा छळ होत होता. मात्र पासपोर्ट व इतर कागदपत्र जप्त केल्याने त्यांचे परतीचे मार्ग ही बंद झाले होते. पती अब्दुल अजीज खान यांनी आयोगाला दिलेल्या माहितीच्या आधारे आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी याबाबत चर्चा करून मदत करण्याची विनंती केली. सुषमा स्वराज यांनी स्वतः ओमान येथील भारतीय दूतावासाला याबाबत लक्ष घालण्याचे आदेश दिले. दूतावासाने ओमान येथील एजंटकडे याबाबत चौकशी सुरु झाल्यानंतर फरीदा खान यांना परत पाठविण्याचा निर्णय झाला आणि १ मे च्या रात्री फरीदा खान याना मुंबईकडे रवाना करण्यात आले.
परत आल्यानंतर औषधचार घेत असलेल्या फरीदा खान यांनी आज विजया रहाटकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तसेच अनेक महिला नोकरीसाठी दुबई, मस्कत येथे जातात मात्र त्यांना गुलामासारखी वागणूक दिली जाते तेव्हा यातून आपल्या सारख्या इतर महिलांना सोडवावे अशी विनंती ही त्यांनी यावेळी केली.
याबाबत बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या कि, 'सुहिता' (७४७७७२२४२४) या नव्यानेच आयोगाने सुरु केलेल्या हेल्पलाइनवर ही तक्रार आली होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाने परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्फत सर्वतोपरी मदत केली आणि आज फरीदा परत आपल्या २ मुली आणि पतीसोबत आहेत. भविष्यात अशा घटनांचा महिलांना सामना करावा लागू नये यासाठी आयोग परराष्ट्र मंत्रालयासोबत काम करणार आहे. तसेच महिलांची फसवणूक करणाऱ्या एजंट विरोधात ही कारवाई व्हावी यासाठी पोलिसांना सूचना देण्यात येतील.