औरंगाबाद, दि.26 (जिमाका)--- महिलांच्या सुरक्षित, सन्मानित जगण्यासाठी राज्य महिला आयोग विविध उपक्रम राबवत असून, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या सक्षमिकरणासाठी क्षमता बांधणी, प्रशिक्षणाचे विशेष कार्यक्रम महिला आयोग या क्षेत्रात कार्यरत स्वंयसेवा संस्थांच्या सोबतीने राबविणार असल्याचे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी येथे सांगितले.
महसूल प्रबोधिनी येथे राज्य महिला आयोग,विभागीय आयुक्त कार्यालय आणि महिला किसान अधिकार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतक-यांचे प्रश्न या दोन दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी विजया रहाटकर बोलत होत्या. व्यासपीठावर डॉ. पुरुषोत्तम भापकर, उपायुक्त वर्षा ठाकूर, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी तृप्ती ढेरे, मकामच्या सिमा कुलकर्णी यांच्यासह इतर संबंधित उपस्थित होते.
श्रीमती रहाटकर यावेळी म्हणाल्या की, शेतात काम करणारी महिला ही खऱ्या अर्थाने समाजातील पहिली कष्टकरी महिला आहे, परंतू प्रत्यक्षात महिला शेतकरी म्हणून तीच्या शेताच्या सातबारावर तीचे नाव असल्याचे प्रमाण हे कमी आहे. महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी शेती व त्याला जोडून इतर पूरक उद्योग, उत्तम पर्याय आहे. त्यादृष्टीने शासन विविध कल्याणकरी योजना राबवत आहे. त्या सर्वांची योग्य माहिती सुलभरित्या या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना उपलब्ध होणे गरजेचे असून त्यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये स्वतंत्र विशेष संसाधन कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे, असे सांगून श्रीमती रहाटकर पूढे म्हणाल्या की, महिलांना आपल्या पतीच्या निधनानंतर आवश्यक तो पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीने संपत्तीत तिचा वाटा मान्य करण्याची मानसिकता समाजामध्ये जोपासण्याची गरज आहे. त्यादृष्टीने तालुकास्तरावर वारसा हक्क नोंदनी शिबीराचे आयोजन महसून विभागामार्फत करणे आवश्यक आहे. त्योसोबतच जनगणनेमध्ये महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र गणना होणे देखील काळाची गरज आहे. महिला शेतकरी म्हणून ग्रामीण भागात शेतात प्रत्यक्ष काम करणाऱ्या, घराची जबाबदारी भक्कमपणे संभाळणाऱ्या महिलांना शेतकरी महिला म्हणून स्विकरण्याची वृत्ती समाजात व्यापक प्रमाणात प्रसारीत करण्यासाठी महिला आयोग या क्षेत्रात कार्यरत विविध स्वंससेवी संस्थासोबत जागृती कार्यक्रम घेणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या तसेच त्यांच्या पाल्यांचा समावेश शासनाच्या प्रेरणा समुपदेशन कार्यक्रमात झाला पाहिजे. सर्वांच्या एकत्रित सकारात्मक प्रयत्नांतून या महिलांच्या सक्षम, समाधानी आयुष्यसाठी आपण विधायक बदल घडवू ,असे आवाहन श्रीमती रहाटकर यांनी यावेळी केले.
विभागीय आयुक्त पुरुषोततम भापकर यांनी यावेळी, आत्मत्याग्रस्त शेतकरी कुंटुंबातील महिलांच्या मानसीक धैर्याला उभारी देणारी ही दोन दिवसीय चर्चासत्र उपयुक्त असे व्यासपीठ असून शेतकऱ्यांच्या, त्यांच्या कुंटुंबीयांच्या सबलीकरणासाठी शासन ,प्रशासन सर्व पद्धतीचे सहकार्य करण्यास कटीबध्द आहे. या शेतकऱ्यांच्या कुंटुंबाचे सर्वेक्षण करुन त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेत त्या दूर करण्याच्या दृष्टीने महसूल प्रशासनाने दि. 15 नोव्हेंबर 2017 रोजी संपूर्ण मराठवाडा विभागात सर्वेक्षण केले होते ,त्याचप्रमाणे येत्या दि. 4 एप्रिल रोजी या कुंटुंबियांचे पून्हा एकदा सर्वेक्षण करुन त्यांच्या आर्थिक, सामाजिक प्रश्नांची दखल घेऊन त्यांना आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच यापूढे प्रत्येक महिन्याला या कुंटुंबियांना प्रत्यक्ष जाऊन अधिकारी भेटतील. पावसाळ्याच्या पूर्वी ज्या महिलांना घर नाही त्या सगळ्यांना घरकुल उपलब्ध करुन दिल्या जाईल. मराठवाडा विभागातील 5 लाख तरुणांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यात 2 लाख 50 हजार युवतींचा सहभाग राहील, असे सांगूण श्री. भापकर पूढे म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी बचतगट ,त्याव्दारे उत्पादन व्यवसाय हा उत्तम पर्याय आहे. त्यासोबतच गट शेती, शेतीचा विमा, सेंद्रीय शेती, मनरेगा, शेततळे, विहीरीसाठी अनुदान या व इतर अनेक उपयुक्त योजना शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात राबवल्या जात आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे श्री.भापकर यावेळी म्हणाले.
या दोन दिवसीय चर्चासत्रामध्ये मराठवाडा विभागातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या असून चर्चासत्रात आत्महत्याग्रस्त कुंटुंब ठरविण्याचे निकष ,वारसा नोंदी, घर आणि शेतजमीन , कर्जाची उपलब्धता, उपजीवीकेसंबंधीचे प्रश्न, सरकारी योजनांचा लाभ ,वारसा नोंदी , शेतीच्या योजनांचा लाभ, महिलांचे अर्थ सहाय्य/ बँक कर्जाबाबतचे प्रश्न ,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुंबातील महिलांचे आरोग्य व उपजिवीका. या विविध विषयांवर वरिष्ठ अधिकारी, कायदेतज्ञ मार्गदर्शन करुन महिलांच्या समस्या जाणून घेणार आहेत. चर्चासत्राचे स्वरुप व उद्देश याबाबत मकामच्या सीमा कुलकर्णी यांनी माहिती दिली.