Home / Initiatives
राज्यातील महानगरपालिका आणि नगरपरिषदामधील महिला व बाल कल्याण समित्यांनी वित्तीय अडचणी दूर करत
स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, महिलांकरिता समुपदेशन कक्ष असे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी काम करावे असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई आणि महाराष्ट्र महापौर परिषद व नगरपरिषदा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदातील सन २०१३ - २०१४ या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या महिला व बालकल्याण समित्यांना पुरस्कार वितरण समारंभ आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
महिला बाल कल्याण समित्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत केंद्र तसेच राज्य शासनाने महिलांना करिता केलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी असे विजया रहाटकर म्हणाल्या. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, कर्मचाऱ्यांच्या मुलांकरिता पाळणाघर, कार्यालयामध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन लावणे, महिलांकरिता समुपदेशन कक्ष तसेच कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून प्रतिबंधाकरिता असलेली अंतर्गत तक्रार निवारण समिती, कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिलांना रोजगार आदी कामे प्रभावीपणे समित्यांनी करावी असे त्या म्हणाल्या.
यावेळी आमदार सुनील प्रभू, मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सनदी अधिकारी जयराज पाठक, महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण आणि राज्यातील महानगरपालिका, नगर परिषद यांचे महापौर, नगराध्यक्ष, महिला बाल कल्याण समिती अध्यक्ष सदस्य उपस्थित होते.