Home / Initiatives
दि. २१ ऑक्टोबर २०१७ - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज हर्सूल कारागृहातील कैद्यांसोबत दिवाळी साजरी केली. कारागृहात असलेल्या महिलांसाठी राज्य महिला आयोगाच्यावतीने लवकरच सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन लावण्यात येणार आहे. हिवाळ्यात महिलांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावं म्हणून सोलर वॉटर हिटर ही आयोगाच्यामार्फत दिला जाणार आहे.
कळत नकळत हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताना कारागृहातील जगणं नशिबी आलेल्या, घरापासून नातेवाईकांपासून दूर असलेल्या महिलांना आ णि त्यांच्या मुलांना दिवाळी सणाचा आनंद मिळावा यासाठी विजया रहाटकर यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले. महिलांना साड्या आणि त्यांच्या मुलांना नवे कपडे यानिमित्ताने देण्यात आले. महिलांप्रमाणेच पुरुष कैद्यांनाही भाऊबीजेच्या दिवशी फराळ तसेच १०० ब्लॅंकेटची भेट देण्यात आली.
कारागृहातील ८० महिला कैद्यांशी यावेळी विजया रहाटकर यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा समजून घेतल्या. तपासणीसाठी महिला डॉक्टर असाव्यात तसेच गंभीर गुन्हे नसलेल्या महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी लवकरच प्रत्येक आठवड्याला कारागृहात महिला डॉक्टर, स्त्रीरोग तज्ञ, समुपदेशक आणि वकील भेट देणार असून यामुळे या महिलांच्या आरोग्याच्या तसेच कायदेविषयक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
दिवाळीच्या दिवशी फराळ, नवे कपडे या भेटींसोबतच आपुलकीने विचारपूस करण्यात आल्याने अनेक महिलांना विजयाताईंशी बोलताना भावना अनावर झाल्या.
या भेटी बाबत बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या कि, दुर्दैवाने कारागृहात जीवन व्यतीत करणाऱ्या आई बहिणींना ही दिवाळीचा आनंद मिळावा म्हणून मी त्यांच्यासोबत सण साजरा केला. सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि सोलर वॉटर हिटरमुळे कैद्यांचे इकडचं जगणं सुसह्य होण्यास मदत होणार आहे. लवकरच दर आठवड्याला इथे महिला डॉक्टर, वकील येतील त्यामुळे स्वास्थ्यपूर्ण आयुष्य आणि न्याय मिळण्याची प्रक्रिया जलद होण्यास मदत होईल.
कारागृहात कैद्यांना प्रशिक्षण देऊन दुचाकीचे लॉक तयार करण्याचा रोजगार मिंडा या संस्थेकडून दिला जातो, या कार्यशाळेला ही विजया रहाटकर यांनी भेट दिली. यावेळी कारागृह अधीक्षक बी आर मोरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी डी काळे, महिला तुरुंग अधिकारी मेघा कदम तसेच स्थानिक भाजप
नेते मनीषा भन्साळी, भूपेश पाटील, रेखा पाटील, स्मिता दंडवते, दिव्या मराठे, मृणालिनी फुलगिरकर, अमृता पालोदकर, बबिता करवा, रुपाली वाहुळे आदी उपस्थित होते.