Home / Initiatives
मुंबई दि. 8 मार्च – जागतिक महिला दिन औचित्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून विविध महाविद्यालये, शासकीय कार्यालय, स्वयंसेवी संस्थांना महिलांविषयक विविध कायदयांची माहिती देणार्या 5000 पुस्तिकांचे वाटप करण्यात येत आहे. यामाध्यमातून सोप्या शब्दांत, मराठी - इंग्रजी भाषेत विविध समाजघटकांत जनजागृती करण्यात येत असल्याचे आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लूथरा यांनी सांगितले.
स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिला वर्गाला कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा तर विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांत कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण 2013 बाबत माहिती देणारी पुस्तिका तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या झिरो टाँलरन्स फाँर सेक्शुअल हरासमेंट आँफ स्टुडंट अँन्ड वुमन इन काँलेज अँन्ड युनिव्हर्सिटीज या इंग्रजी पुस्तिकेचे वाटप करण्यात येत आहे.
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा या पुस्तिकेत हिंसाचाराची व्याख्या स्पष्ट करणारे मुद्दे, महिलांचे अधिकार, समुपदेशन केंद्र, भारतीय दंड विधानातील (आय.पी.सी) विशेष तरतुदी यांची माहिती आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयांत कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण या कायद्यांतर्गत कायद्याची माहिती, अंतर्गत तक्रार निवारण समितीची रचना, कार्य, स्वरुप, चौकशी प्रक्रिया या संकल्पना विषद करण्यात आल्या आहेत. महाविद्यालये, विद्यापीठांतील महिलांनाही कायद्याने संरक्षण दिले असुन प्रशासनाने त्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे तेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंग्रजीत कायदा, विद्यार्थी तसेच शैक्षणिक संस्थांची भुमिका यासोबतच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) असलेले निर्देश, सुचना याची ही विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती आस्था लूथरा यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 9 मार्च 2020 रोजी राज्य महिला आयोग आणि चेतना वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चेतना महाविद्यालय, वांद्रे येथे जागतिक महिला दिन साजरा होणार आहे.